नेतेमंडळींनी माझ्या घरी सांत्वनासाठी येऊ नये’, नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचं आवाहन

पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 65 वर्षीय नराधमाने अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडित चिमुकलीला निर्घृणपणे संपवलं. यानंतर आरोपीने पीडितेला गोठ्यात शेणात लपवलं होतं. या संतापजनक प्रकारामुळे संपूर्ण देश हादरलं आहे. आरोपी इतक्या निर्घृण कृत्य करुच कसा शकतो? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नसरापूरच्या गावकऱ्यांकडून आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा द्यावी किंवा आरोपीला गावकऱ्यांच्या हाती सोपवावं, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेनंतर विविध पक्षाचे नेते नसरापूरला जावून पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत आहेत. पण पीडितेच्या वडिलांनी नेतेमंडळींना आवाहन केलं आहे. पीडितेला न्याय मिळत नाही तोपर्यंत नेतेमंडळींनी भेटायला येऊ नये, असं आवाहन पीडितेच्या वडिलांनी केलं आहे.
नेतेमंडळींनी आम्हाला भेटायला येऊ नये, अशी विनंती नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांनी केली आहे. मुलीला न्याय मिळेपर्यंत कुणीही भेटायला येऊ नये, असं आवाहन पीडितेच्या वडिलांनी केलं आहे. पीडितेच्या वडिलांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आपली भूमिका मांडली आहे.
पीडित चिमुकलीचे वडील आस्थी विसर्जनासाठी देहू या ठिकाणी गेले असताना, विविध पक्षांचे नेते त्यांच्या घरी सांत्वनासाठी भेट देत आहेत. पण चिमुकलीच्या वडिलांनी नेतेमंडळींना भेटायला येऊ नये, असं म्हटलं आहे. जोपर्यंत माझ्या मुलीला न्याय मिळत नाही. तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याने माझ्या सांत्वनासाठी येऊ नये, असं आवाहन चिमुकलीच्या वडिलांनी केलं आहे.

पीडितेच्या वडिलांनी नेमकं काय म्हटलं आहे?
“नमस्कार! मी पीडित मुलीचा वडील. आता मी आस्थी विसर्जनासाठी देहू इथे आलो असताना, माझ्या घरच्यांकडून मला फोन आला की, तिथे बरेच राजकारणी लोकं सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे. जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी मिळत नाही, तोपर्यंत एकाही राजकारण्याने आमच्या घरी भेटायला येऊ नये. एवढी माझी नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कुणी लोकं आहेत, त्यांना आम्हाला भेटायचं असेल तेव्हा भेटू. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही नराधमाने माझ्या सांत्वनासाठी येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे”, असं पीडितेचे वडील म्हणाले आहेत.

Leave a Reply