माजलगाव: शहरात २१ एप्रिल २०२६ रोजी एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोलिसांनी तपासाअंती गुन्ह्याची व्याप्ती वाढवत अधिक गंभीर कलमे लागू केली आहेत. या प्रकरणातील आरोपी शेख रहमान याची रवानगी बीड येथील निरीक्षण गृहात करण्यात आली असून, पीडितेच्या सविस्तर जबाबानंतर हा निर्णय घेण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, माजलगाव शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक १२२/२६ मध्ये सुरुवातीला भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५, ७९ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८, १२ नुसार कारवाई करण्यात आली होती. मात्र, पिंक पथकाने केलेल्या सखोल तपासानंतर आणि पीडितेच्या नव्या जबाबामुळे आता या गुन्ह्यात कलम ६४(२)(एम), ६५, ३०८ आणि ३५१(२) बीएनएस सह पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ६ या अत्यंत गंभीर कलमांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तांत्रिक आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
पोलिसांनी आठ दिवसानंतर कॅफे बंद केला.
माजलगाव शहरात बलात्कारासारखा एवढा गंभीर प्रकार घडूनही बेकर्स अँड लॉज हा कॅफे बंद करण्यात आला नव्हता. विविध माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या नंतर ज्या कॅफेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला तो कॅफे बंद करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कॅफे बंद का केला नाही यावरून पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत असून घटना घडवून गेल्यानंतर तब्बल आठ दिवस हा कॅफे सुरू होता दरम्यानच्या काळात घटनास्थळी असलेले पुरावे नष्ट करण्यात आल्याचा संशय आहे.
कॅफेतील सीसीटीव्ही चेक केले पाहिजेत.
माजलगाव येथील प्रकरणात अजून पाच ते सहा मुली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे दरम्यान ज्या कॅफेत मुलीवर बलात्कार झाला त्या कॅफेतील मागील एक महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले पाहिजेत तेव्हाच या प्रकरणाच्या मुळाशी पोलिसांना जाता येईल परंतु आठ दिवस कॅफे बंद न केल्याने सीसीटीव्ही फुटेजही नष्ट केल्याचा संशय व्यक्त होत आहे.