बडोदा: गुजरातच्या बडोद्यात सांता क्लॉजचा पोशाख परिधान करून फिरणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. सांताक्लॉजचा पोशाख घालून फिरणाऱ्या व्यक्तीला मारहाण झाली आहे. मकरपुरातील रहिवाशी वसाहतीत मंगळवारी जमावानं एका व्यक्तीला मारहण केली.या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सांता क्लॉजच्या वेशात शशीकांत डाभी नावाची व्यक्ती मकरपुरा परिसरातील अवधूत सोसायटीत ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली. त्यांच्यासोबत ख्रिश्चन समाजाचे काही नेतेदेखील होते. यावेळी काही जणांचा एक गट तेथे आला व त्यांनी कार्यक्रम रोखला आणि सांता क्लॉजवर हल्ला केला. जमावानं त्यांना पोशाख काढायला लावला. उत्सवात सहभागी झालेल्यांना धमकावलं. इथे अशा प्रकारचा उत्सव साजरा करू देणार नाही, असं म्हणत जमावानं सांता क्लॉजवर हल्ला केला.
जमावानं केलेल्या मारहाणीत एक महिलेसह चार जण जखमी झाले. हल्लेखोरांनी फादरचे कपडे फाडल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात बडोद्यातील मकरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.