Majalgaon माजलगावात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
माजलगाव, दि.१: तालुक्यातील देपेगाव येथील शेतकरी विठ्ठल गणेशराव काळे (वय ५२ वर्षे) यांनी कापसाला भाव नसल्याने व कर्जदारांचा सततचा तगादा यास कंटाळून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (शनिवार) घडली आहे.(Farmer suicide in majalgaon block)
याविषयी अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील देपेगाव येथील शेतकरी विठ्ठल गणेशराव काळे ह्यांना ३.५ एक्कर शेती असून, त्यांनी यंदा कापसाचे पीक घेतले होते. परंतू, कापसाला योग्य भाव नसल्याने कापूस घरात पडून आहे. परिणीता पैसा नसताना पतसंस्था व खाजगी सावकारांच्या सततच्या वसुलीचा तगादा यामुळे विठ्ठल काळे हे नैराश्यात होते. यातूनच त्यांनी आज दि.१ शनिवारी सकाळी त्यांच्या भावाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंह जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक सुनिल बोडके, पोलीस कॉन्स्टेबल पोटे यांनी भेट दिली. यावेळी शेतकरी विठ्ठल काळे यांच्या खिशात चिट्टी आढळली. त्यात कापसाला भाव नसल्याचे व पतसंस्था व खाजगी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचे लिहिले असल्याचे कळते. सदरील शेतकऱ्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून,पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.