रायगड प्राधिकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह!

*रायगड प्राधिकरणाच्या कामावर शिवप्रेमींकडूनच प्रश्नचिन्ह ?* छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी आणि अठरापगड, बारा बलुतेदार अर्थातच मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या दुर्गराज रायगडाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने किल्ले रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केलेली आहे. वर्ष २०१६ शिवराज्यभिषेक उत्सवामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड प्राधिकरणाची घोषणा केली होती. केंद्रात भाजपा सरकार काळात राज्यसभा नामनिर्देशित सदस्य माजी खासदार कोल्हापूरचे छत्रपती संभाजी यांची अध्यक्षपदी निवड करुन विकास कृती आराखड्यासाठी सहाशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद महाराष्ट्र सरकारने केली होती. पण गेल्या दहा वर्षांत रायगड प्राधिकरणाच्या कामकाजावर शिवप्रेमींकडूनच काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

रायगडावरील निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि तेथील अव्यवस्था पाहता करोडो रुपये खर्च करून सुध्दा तेथे काहीच फरक पडलेला दिसत नसून येथील अवस्था जशीची तशीच दिसत आहे. त्यामुळे दुर्गराज रायगड विकासासाठीचा निधी कुठे गेला आणि खर्च झालेल्या शासकीय निधी मध्ये भ्रष्टाचार झाला काय?असा प्रश्न शिवराज्याभिषेक उत्सवात रायगडावर शिवप्रेमींमध्ये पुन्हा चर्चिला गेला आहे.
*रायगडाची माती हिंदुस्तानचे प्रेरणास्थान* दुर्गराज रायगड आणि तेथील माती हिंदुस्तानची प्रेरणा व अस्मिता असून दि.६ जून रोजी इंग्रजी तारखेप्रमाणे झालेल्या रायगडावरील श्री शिवराज्याभिषेकासाठी प्रचंड शिवप्रेमींची उपस्थिती होती. आणि ती उपस्थिती चांगली बाब म्हणावी लागेल. छत्रपती शिवरायांवरील श्रद्धेपोटी लाखो शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटक रायगडावर येतात. तेथील माती आपल्या मस्तकी लावून धन्य होत असतात. परंतू तेथे शिवप्रेमींच्था होत असलेल्या गैरसोयीने रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

श्री शिवराज्यभिषेकाच्या दिवशी रायगडावर प्राधिकरणाकडून शिवभक्तांसाठी साधे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली नव्हती. गडावरील स्वच्छतागृहे आणि वॉटर फिल्टरची अवस्था बिकट आहे. शिवराज्याभिषेकाच्या दुसऱ्या दिवशी तर रायगडावर पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बॉटल आणि स्वच्छता गृहे अभावी अनेक ठिकाणी उघड्यावर केलेल्या मानवी विष्टा दिसत होत्या. शिवप्रेमींसाठी व्यवस्था विषय महत्वाचा नाही, परंतू जेव्हा रायगडवर लाखो शिवभक्त येणार हे माहित असूनही प्राधिकरणाकडून व्यवस्था का करण्यात आल्या नव्हत्या? रायगडावरील स्वच्छता व इतर व्यवस्थांची जबाबदारी प्राधिकरणाची नाही का? रायगड आणि तेथील माती संपूर्ण हिंदुस्तानसाठी प्रेरणा स्थान असून तेथे गैरप्रकार होणे अपेक्षित नाही. त्यामुळे शिवप्रेमींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर रायगड प्राधिकरण अध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजी राजे यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे. छत्रपती संभाजी राजे छत्रपती घराण्याचे वंशज असून त्यांच्याविषयी श्रद्धा आणि आदर आहेच पण देशात संविधान आहे, लोकशाही आहे, कायद्याचे राज्य आहे त्यामुळे शिवप्रेमींमध्ये व्यक्त झालेल्या चर्चा आणि प्रश्नांवर त्यांनी व्यक्त झालेच पाहिजे.

*आग लागल्या शिवाय धूर निघत नाही* देशातील करोडो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गराज रायगडच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने प्राधिकरणाचा कृती आराखडा तयार केला असून रायगड प्राधिकरणाला गेल्या काही वर्षात सहाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. पण रायगडावर गेल्यास तेथे पायाभूत सुविधा उभ्या झाल्या नाहीत. पायाभूत सुविधांची दुरावस्था झाल्याचे चित्र काल-परवा तारखेच्या शिवराज्यभिषेक दिन उत्सवामध्ये दिसून आले आहे. रायगड प्राधिकरण अंतर्गत तेथे झालेल्या कामात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा सुद्धा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. पुण्यातील काही शिवप्रेमींनी रायगड बचाव समितीची घोषणा केली आहे. तसेच रायगड प्राधिकरण बरखास्त करावे अशी मागणी रायगड बचाव समितीच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या सैन्यातील सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज लौकिक गोळे आणि ॲड. अर्चना मारणे यांनी केली. लौकिक गोळे हे छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात कर्तृत्व गाजविणाऱ्या पिलाजी गोळे यांचे वंशज असल्याने प्राधिकरण अध्यक्ष छत्रपती संभाजी यांच्यावर केलेले आरोपाला विशेष महत्व आहे तसेच छत्रपती संभाजी राजे यांनी रायगड प्राधिकरणाच्या पहिल्याच बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून स्वतःसाठी इनोव्हा गाडी खरेदी केल्याची चर्चा सुद्धा लौकिक गोळे यांनी केली आहे. त्यामुळे “आग लागल्या शिवाय धूर निघत नाही.” म्हणजे कोणतीही चर्चा किंवा आरोप कारणाशिवाय निर्माण होत नाहीत. एखाद्या गोष्टीची चर्चा होत असेल, तर त्यामागे काहीतरी निश्चित कारण किंवा तथ्य असण्याची शक्यता असते.भ्रष्टाचार होत असल्याची शंका व्यक्त करणे यालाच “आग लागल्या शिवाय धूर निघत नाही” असे म्हटले जाते.

*रायगड प्राधिकरणाची नऊ वर्षांची कारकीर्द?* हिंदुस्तानची अस्मिता असलेल्या दुर्गराज रायगडाच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने रायगड प्राधिकरणाची स्थापना २०१६ साली केली आहे. गेल्या दहा वर्षांत रायगड विकास प्राधिकरणासाठी सहाशे कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर असूनही तेथील पाणी, स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन आदी पायाभूत सुविधांची दुरवस्था झाली आहे. तसेच रायगडावरील टकमक टोकाजवळच्या सुरक्षा जाळ्या गंजलेल्या, चुन्याचा घाणा, शिवकालीन दारूची जाळी आदी ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान होत आहे. तसेच विकासाच्या नावाखाली करण्यात आलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची असून लौकिक गोळे यांच्या सोशल मीडियावरील व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार कोण? पुरातत्व विभाग आणि इतर यंत्रणांची जबाबदारी आहेच परंतू रायगड प्राधिकरण अध्यक्ष म्हणून छत्रपती संभाजी यांची सुद्धा महत्वाची जबाबदारी असून शिवप्रेमींनी उपस्थित केलेल्या रायगड प्राधिकरणाच्या कामावर प्रश्नचिन्हांवर खुली चर्चा करून व्यक्त झाले पाहिजे. अशोक राणे भ्रम.९४२३६५८४८५

Leave a Reply