पुणे : राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. त्यांना बुधवारी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 73 वर्षांचे होेते. बुधवारी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव दुपारी 2 ते 6 पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे .
गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. परंतु त्यांच्यांवर घरीच उपचार सुरु होते. बुधवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यांवर डॉक्टरांनी उपचार सुरु केले होते. परंतु उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.
स्वयंसेवक ते भाजप नेते असा आहे प्रवास
गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत. जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात केलेले गिरीश बापट 1995 पासून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसेच्या मोहन जोशी यांना पराभव करत त्यांनी लोकसभा गाठली होती.
गिरीश बापट यांचा अल्प परिचय
गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडेमधून प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले. बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर बापट 1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. त्यानंतर दोन वर्षांतच आणीबाणीमध्ये 19 महिन्यांचा कारावास नाशिक जेलमध्ये त्यांनी भोगला. पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जात असे.
टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून राजकारणात त्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून पाहिले नाही. दरम्यान खासदार बापट यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे.