ठाकरेंचे खासदार फुटलेच! राऊतांच्या ट्विटमुळे ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवर शिक्कामोर्तब; पक्ष सोडणाऱ्यांची किंमत सांगत लायकीही काढली… खासदार आजच स्थापन करणार नवीन गट?

एकनाथ शिंदेंनी जून २०२२ मध्ये ४० आमदारांना फोडून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. अशाच प्रकारचा दुसरा धक्का २०२६ च्या जून महिन्यात शिंदे ठाकरेंना देण्याच्या तयारीत असून यासाठी दिल्लीत मोठ्या घडामोडी सुरू असल्याचं आता लपून राहिलेलं नाही.

त्यामुळे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत ऑपरेशन टायगर आता प्रत्यक्षात घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमांनी कालपासून ठाकरेंचे पक्षाचे सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं निश्चित झाल्याच्या बातम्या सुरू केल्या आहेत.
शिवाय ठाकरे गटाचे सहा खासदार आज सकाळी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना पत्र देऊन आपण ठाकरे गट साडून शिंदेंना पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट करणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र, या सर्व चर्चा केवळ सुत्रांच्या माहितीच्या आधारे दिल्या जात होत्या. पंरतू, आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल रात्री केलेल्या दोन ट्विटमुळे आता ठाकरे गटात बंड नक्कीच होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
संजय राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘अपना सपना मनी..मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी १५ कोटींचा अॅडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे.’ असं म्हणत राऊतांनी थेट आपल्या खासदारांना १५ कोटींचा अॅडव्हान्स दिल्याचा दावा केला आहे.

शिवाय त्यांनी काही वेळाने राऊतांनी टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांचे एक ट्विट रिट्विट करत लिहिलं की, ‘अपना सपना मनी मनी, महुआजी खासदारांची किंमत प्रत्येकी ५० कोटी अशी ठरली आहे.(पन्नास खोके) १५ कोटी हा फक्त अॅडव्हान्स आहे. खरंतर या लोकांची किंमत ५० हजारही नाही. पण त्यांना एवढी किंमत मिळतेय, ती फक्त शिवसेना आणि टीएमसीच्या ब्रँड लेबलमुळेच वाढली आहे.’

या पोस्टमध्ये तर थेट राऊतांनी शिवसेना या नावामुळे खासदारांना ५० खोके मिळणार असल्याचं म्हणलं आहे. त्यामुळे त्यांनी आता ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार फुटणार असल्याचे संकेत स्पष्टपणे दिले आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे काही फुटीर खासदार आणि एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे.

फुटीर खासदारांच्या या गटाला एक केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. खासदार अरविंद सावंत, संजय राऊत आणि खासदार अनिल देसाई हे देखील दिल्लीला पोहचले आहेत.

त्यामुळे ठाकरेंचे नेते हे डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, ठाकरेंची साथ सोडून शिंदेसेनेत दाखल होणाऱ्या खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावांचा समावेश असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Leave a Reply